भरधाव अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने दुचाकीवरून निघालेल्या दोघा मित्रांपैकी एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी गावानजीक घडली.
अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालक युवकाचे नाव अरुण कोलते (वय 22) असे असून गंभीर जखमीचे नाव विशाल मारुती मन्नोळकर (वय 26) असे आहे. हे दोघे आपल्या दुचाकीवरून जात असताना आंबेवाडी गावानजीक काल रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.
ही धडक इतकी जोराची होती की अरुण जागीच ठार झाला. या अपघातात दुचाकीवर अरुणच्या मागे बसलेला विशाल मन्नोळकर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सदर अपघाताप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.