बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सांबरा येथील विमानतळाचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी पुढे आली असून या मागणीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बेळगाव विमानतळाला क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विविध कन्नड संघटनांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. बेळगाव दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या संदर्भात बोलताना, नामकरण करण्यासंदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.
प्रसारमाध्यमांवर ही माहिती झळकताच जनतेतून विमानतळाच्या नामकरणासंदर्भात विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असून विमानतळाचे नामकरण करण्याऐवजी विमानतळावर उत्तम सुविधा आणि अधिकाधिक विमानसेवा पुरविण्यासंदर्भात वाढती मागणी होत आहे. अलीकडे बेळगाव विमानतळावरून रद्द करण्यात आलेल्या विमानसेवा पुन्हा पूर्ववत करण्यात याव्यात, अधिकाधिक शहरांना जोडता येईल अशी विमानसेवा सुरू करण्यात यावी आणि बेळगाव विमानतळाचा विकास आणि अधिक प्रगतीकडे भर द्यावा, अशा मागण्यांकडे जनतेचा अधिक भर दिसून येत आहे.
विमानसेवा, सर्वाधिक उड्डाणे पुरविणाऱ्या यादीत बेळगाव विमानतळ प्रगतीपथावर होते. राज्यातील सर्वाधिक विमानफेऱ्या करणाऱ्या विमानतळाच्या यादीत बेळगाव विमानतळाचे नाव आले होते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणामुळे आणि दुर्लक्षामुळे पुन्हा बेळगाव विमानतळाची प्रगती खुंटली आहे. विविध शहरांना जोडलेल्या विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे बेळगावमधील जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
शिवाय परराज्यातून बेळगावमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांतुन आणि व्यवसायासाठी विमानप्रवास करणाऱ्या नागरीकातून नाराजी व्यक्त होत आहे. विमानतळावर सेवा-सुविधा पुरवण्या ऐवजी राज्यकर्ते आणि नेतेमंडळी नामकरणावर अधिक भर देत असल्याबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.