बेळगाव शहर विकास प्राधिकरणामध्ये (बुडा) कथीत 150 कोटी रुपयांच्या भूखंड लिलाव घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे (आप) आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन मॅन्युअली असा दोन वेळा भूखंडांचा लिलाव करण्यात आला. मागील होळी रंगपंचमीला सुट्टी असताना ऑफलाइन मॅन्युअल पद्धतीने लिलाव करून त्यात सरकारची फसवणूक करून सुमारे 150 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. या घोटाळ्यात कांही लोकप्रतिनिधी आणि बुडा अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाने (आप) केली आहे. सदर मागणीच्या पूर्ततेसाठी पक्षाचे नेते राजकुमार उर्फ राजू टोपण्णावर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू टोपण्णावर म्हणाले, बुडामधील 150 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाने नगर विकास खाते, पोलीस प्रशासन आणि लोकायुक्तांकडे केली होती. नगर विकास खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना 7 दिवसात या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी अद्यापही अहवाल दिलेला नाही. दरम्यान लोकायुक्तांनी बुडाला आपले म्हणणे मांडण्यासाठी येत्या 4 मार्चपर्यंतचा कालावधी दिला आहे.
या पद्धतीने एवढ्या गंभीर प्रकरणात 4 महिन्यांची दीर्घ मुदत दिल्याने बोगस कागदपत्रे व्हिडिओग्राफी करून सर्व प्रक्रिया कायदेशीर भासवली जाण्याची शक्यता असल्याचे सांगून एकंदर या प्रकरणात सरकार आणि वरिष्ठ अधिकारी बुडामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप टोपण्णावर यांनी केला. गेल्या 20 वर्षात बुडाने नवीन वसाहत निर्माण केलेली नाही. केवळ शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादन करून त्या भू-माफियांच्या स्वाधीन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. परिणामी बेळगावातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा दरात भूखंड मिळणे दुरापास्त झाले आहे.
त्यामुळे या एकूणच प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी आम आदमी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.