बेळगाव लाईव्ह : डबल इंजिन सरकार मधील भाजप नेते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेसमोर फासे फेकतात. उमेदवारी मिळविण्यासाठी जनतेला निराधार आणि निरर्थक माहिती देतात, आश्वासने देतात. बेळगावला ‘ब्रँड’ म्हणून प्रोत्साहन देण्यात भाजप पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि अपयशामुळे बेळगावची आर्थिक परिस्थिती याचप्रमाणे औद्योगिक आणि शैक्षणिक परिस्थितीही खालावली असून सर्व क्षेत्रावर भाजप सरकारच्या अपयशाचा फटका जाणवत आहे, असे घणाघाती आरोप आपचे बेळगाव उत्तर प्रभारी राजकुमार टोपण्णावर यांनी केले.
भाजपामुळे आज बेळगावची प्रगती खुंटली असून बेळगाव मध्ये जेव्हा जेव्हा विविध पद्धतीच्या समस्या उद्भवतात तेव्हा प्रत्येक जाती- धर्माचे- भाषेचे लोक एकसंघ होऊन लढा उभारतात. यावेळी हेच भाजप नेते केवळ भाषणबाजी करतात, असा आरोपही राजकुमार टोपण्णावर यांनी केला.
बेळगाव विमानतळाबाबत भाजप राजकारण्यांचे होत असलेले दुर्लक्ष आणि आपल्या सोयीनुसार बेळगाव विमानतळाचे होत असलेले राजकारण यावरदेखील टोपाण्णावर यांनी प्रतिक्रिया दिली असून बेळगाव मधील भाजप नेते जनतेला चुकीची माहिती पुरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. सध्या बेळगाव विमानतळा संदर्भात सुरू असलेला गोंधळ देखील भाजप नेत्यांमुळे झाला असून काही लोकप्रतिनिधी विमानतळासंदर्भातही चुकीची माहिती पुरवत असल्याचे टोपण्णावर म्हणाले. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू ही शहरे उडान योजनेअंतर्गत येत नाहीत. मात्र, या शहरांना उडान योजनेला जोडून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचे राजकुमार टोपण्णावर म्हणाले.
बेळगाव विमानतळापेक्षा हुबळी विमानतळ हे सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, बेळगाव मधील भाजप नेत्यांमुळे बेळगावचा सर्वांकष विकास खुंटला असल्याचे टोपण्णावर यांनी सांगितले. हुबळी येथील राज्यकर्त्यांचे सरकार दरबारी अधिक वजन आहे.
मात्र, बेळगाव मध्ये 18 आमदार आणि चार खासदार असूनही सरकार दरबारी त्यांचे वजन कमी पडत असल्याचे ते म्हणाले. बेळगावचे भाजप नेतृत्व आणि त्यांच्या चुकीच्या राजकारणामुळे बेळगावचा नाहक बळी जात असून बेळगावची आर्थिक परिस्थिती तसेच शैक्षणिक परिस्थितीही खालावत चालली असल्याचे टोपण्णावर म्हणाले. स्थगित झालेल्या विमानसेवेमुळे बेळगाव मध्ये परराज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. याचप्रमाणे व्यापाऱ्यांनाही त्रास होत आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आदी शहरांना जोडणारी कनेक्टिंग फ्लाईट उपलब्ध होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव विमानतळावरून गेल्या वर्षभरात बारा विमानांची उड्डाणे रद्द झाली असून याबाबत भाजप नेत्यांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. किंवा कोणत्याही प्रकारची कार्यतत्परता विमानसेवा सुरू करण्यासाठी दाखवली नाही. भाजपनेते केवळ आश्वासने देतात. भावनिक खेळ खेळून धार्मिक विषयावर राजकारण करतात. बेळगावची स्मार्ट सिटी मध्ये ज्यावेळी निवड झाली तेव्हापासून आजतागायत स्मार्ट सिटी प्रकल्पात आलेले अपयश हे सर्वश्रुत आहे. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी या केवळ भावनिक पातळीवर खासदार म्हणून निवडून आल्या. पक्षाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. मात्र, ज्यांच्याकडे हजारोंची लाखोंची संपत्ती आहे त्यांना सहानुभूती दाखवण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना सहानुभूती दाखवण्याची आवश्यकता असल्याचे राजकुमार टोपण्णावर म्हणाले