बेळगाव शहराजवळील कोंडुसकोप्प गावाशेजारील माळावर एका मेंढपाळाच्या 10 मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. पशुवैद्यकीय अधिकारी आनंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुसर अर्थात टाकाऊ अन्न खाल्ल्यामुळे या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
कोंडुसकोप्प गावाशेजारील माळावर एका मेंढपाळाच्या 10 मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्या असून त्यामुळे संबंधित मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शिळे टाकाऊ अन्न (मुसर) खाल्ल्यामुळे सदर मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, शेळ्या -मेंढ्यांचे अन्न हे गवताचा चारा असते, मुसर नव्हे. मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांनी मुसर खाल्ले होते. त्यामुळे रुमीरोलाॅसिकोसिस होऊन त्या मरण पावल्या.
सदर मेंढ्यांना परवा सायंकाळपासून त्रास सुरू झाला होता. मात्र मेंढपाळांनी काल दिवसभर कोणाचे तरी ऐकून मनाला येईल ते उपचार केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. आज सकाळी माजी महापौर यल्लाप्पा कुरबूर यांनी आम्हाला मेंढ्या मरण पावल्याची माहिती फोनवरून कळवताच आम्ही तात्काळ या ठिकाणी दाखल झालो.
मुसर खाल्ल्यामुळे अन्य 30 -40 मेंढ्या देखील अस्वस्थ झाल्या होत्या. मात्र आम्ही त्यांच्यावर उपचार केले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे असे सांगून कृपया शेळ्या-मेंढ्यांना काही आजार झाल्यास मेंढपाळांनी जवळच्या जनावरांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. स्वतःहून मनाला येईल ते उपचार करण्यात आले शेळ्या-मेंढ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान, माळावर मोठ्या प्रमाणात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची बातमी कोंडसकोप्प गावात वाऱ्यासारखी पसरताच माळावर बघ्याची एकच गर्दी झाली होती.
https://youtu.be/5XVOYzh2rWU