लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. बेळगावातील हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळाव्याला परवानगी देण्यासंदर्भात प्रशासन आणि सरकारच योग्य तो निर्णय घेईल असे स्पष्टीकरण कर्नाटक विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी दिले.
सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध येथील कामकाजाची माहिती घेण्यासाठी सभापती हेगडे कागेरी बेळगावात आले होते.सुवर्णसौधला भेट देऊन सभापतींनी तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी पत्रकारांशी झालेल्या संवादा दरम्यान त्यांनी महा मेळाव्या संदर्भात स्पष्टीकरण दिले.
अधिवेशन काळात 31 संघटनांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. लोकशाही मार्गाने मोर्चा, धरणे, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. आंदोलनाला अथवा महामेळावाला परवानगी देण्यासंदर्भात परिस्थितीचा विचार करून जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार योग्य तो निर्णय घेत असते. अधिवेशनादरम्यान सभागृहात सीमा प्रश्नावर चर्चा करण्याबाबत सरकारकडून आलेल्या प्रस्तावा नंतरच पुढील कार्यवाही होऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनादरम्यान आंदोलनासाठी येणाऱ्यां साठी यावेळी कोंडूसकोप्प-बस्तवाड परिसरातील 71 हजार स्क्वेअर फुट जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी वाहनतळ आणि मीडिया स्टॉलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आंदोलकांना तंबू, पाणी, लाईट व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असेही हेगडे कागेरी यांनी स्पष्ट केले.
बेळगाव अधिवेशनासाठी सज्ज
15 व्या विधानसभेचे 14 वे अधिवेशन 19 ते 30 डिसेंबर दरम्यान बेळगावच्या सुवर्ण विधानसभा येथे होणार आहे.अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर कामे हाती घेतली आहेत. सदर अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील विषयांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी म्हंटले आहे
पुढे बोलताना अध्यक्ष हेगडे कागेरी म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत उपसभापती आमदार आनंद मामणी व अन्य दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सदर अधिवेशनात सहा विधेयकांव चर्चा केली जाणार आहे. अधिवेशनात कोणत्याही प्रकारची त्रुटी न ठेवता नीटपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मागील वेळच्या अनुभवाच्या आधारे निवास, भोजन, वाहतूक इत्यादींची उत्तम व्यवस्था केली जाईल.सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी निर्देश दिले.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंध मुक्त वातावरणात अधिवेशन होणार आहे. कोविड नसल्यामुळे यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे प्रश्नोत्तर सत्र, शून्य सत्र, विधेयक मंजूर करणे यासह कामकाजाची सर्व कामे वेळापत्रकानुसार पार पडतील.जनतेला कार्यवाही पाहण्याची संधी दिली जाईल.प्रवेशद्वारावर आवश्यक ओळखपत्र सादर केल्यानंतर नागरिकांना प्रवेश दिला जाईल.
विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर सर्वोत्कृष्ट आमदाराची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळच्या बेळगाव अधिवेशनात सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार दिला जाणार आहे.सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कारासाठी निवड समितीने दिलेल्या अहवालावर आधारित असेल.
संपूर्ण कर्नाटक, विशेषतः उत्तर कर्नाटक भागाच्या प्रश्नांवर चर्चेसाठी अधिक संधी दिली जाईल. त्यासाठी योग्य दिवस निश्चित केले जातील.
सुवर्णविधान सौधचा उर्वरित कालावधीत चांगला उपयोग करावा.वर्षभर उत्साहाने उपक्रम राबवावेत, आमदार निवास बांधकामासह विविध मुद्द्यांवर शासनस्तरावर चर्चा करून योग्य ती पावले उचलली जातील.
अधिवेशनाच्या कामकाजात मंत्री आणि आमदारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. अत्यावश्यक परिस्थितीत त्यांच्या परवानगीने कार्यवाहीला उपस्थित राहण्यापासून सूट दिली जाऊ शकते.अधिवेशनाचा उद्देश लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे हा आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांना प्रतिसाद देत सर्वांनी सभागृहात सहभागी व्हावे, अशी विनंती सभापती हेगडे कागेरी यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त बोरलिंगया, जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, राज्यसचिव अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महामेळाव्याच्या परवानगी बाबत सभापती कागेरी काय म्हणालेhttps://t.co/KQ1o29N1J8 pic.twitter.com/enfxjERJEx
— Belgaumlive (@belgaumlive) December 12, 2022