कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत सुवर्ण विधानसौधमध्ये जाण्यासाठी बेळगाव महापालिकेने नगरसेवकांना पास दिले असले तरी त्यावर ‘पब्लिक पास’ असा उल्लेख करण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आपल्याला नगरसेवक म्हणून निवडणूक विभागाकडून रीतसर प्रमाणपत्र देण्यात आले असून गतवर्षी विधानपरिषद निवडणुकीत आम्ही मतदानाचा हक्क देखील बजावला आहे. मात्र तरीही महापालिकेकडून अद्याप आम्हाला नगरसेवक पदाचा दर्जा का दिला जात नाही? असा सवाल नगरसेवक करत आहेत.
अधिवेशन काळासाठी दिलेल्या पासवर नगरसेवकांसाठीचा पास असा उल्लेख हवा होता, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. अधिवेशन काळासाठी आमदारांच्या कार्यालयातील शिफारशीनंतर काहींना जे पास दिले जात आहेत ते नगरसेवकांना देण्यात आलेल्या पाचपेक्षा दर्जेदार आहेत अशी प्रतिक्रियाही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
अधिवेशन काळात नगरसेवकांना सुवर्णसौधमध्ये जाता यावे. त्यांना अधिवेशनाच्या कामकाजाची माहिती घेता यावी. यासाठी त्यांनाही पास देण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा प्रशासक नितेश पाटील यांनी महापालिकेला केली आहे. त्यानुसार महापालिकेकडून पास तयार करून त्यावर बेळगावचे विधिमंडळ अधिवेशन असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याखाली पब्लिक पास असं ठळक उल्लेख आहे.
त्यानंतर नगरसेवकाचे छायाचित्र व मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आला आहे. महापालिका निवडणूक होऊन 15 महिने लोटले तरी अद्याप नगरसेवकांचा शपथविधी झालेला नाही. त्यामुळे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आलेले नसून आधीच नगरसेवक नाराज आहेत. त्यातच आता अधिवेशनासाठी पब्लिक पास दिल्याने नगरसेवकांच्या नाराजीत भर पडली आहे.
दरम्यान, नगरसेवक असा उल्लेख त्या पासवर का करण्यात आला नाही? या नगरसेवकांच्या प्रश्नाला महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून अद्यापही उत्तर मिळालेले नाही.