पोलिसांकडे वारंवार तक्रारी करून देखील एपीएमसी मुख्य रस्त्यावर गेल्या तीन वर्षापासून धूळ खात पडून असलेली बेवारस कार अद्यापही रस्त्यावरून हटविण्यात न आल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील एपीएमसी मुख्य रस्त्यावर गेल्या 2019 पासून एक निळा रंगाची कार बेवारस अवस्थेत थांबलेली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी ही कार रस्त्यावरून हटविण्यात यावी यासाठी एपीएमसी पोलिसांकडे नागरिक व वाहन चालकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
मात्र अद्यापपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी या रस्त्यावरून ये -जा करणारे नागरिक आणि वाहनचालकांसाठी सदर बेवारस कार त्रासदायक ठरत आहे.
सध्या या रस्त्याचे विकास काम सुरू आहे. तथापि हे काम करताना देखील रस्त्यावरील ती कार हटविण्याची तसदी घेण्यात आली नसल्याबद्दल नागरिकात आश्चर्य व्यक्त होत आहे.
तसेच तब्बल तीन वर्ष रस्त्यावर पडून असलेली ही बेवारस कार हटविण्यास पोलीस खाते का तयार नाही? असा सवाल उपस्थित करण्याबरोबरच त्यामागे कांही गौडबंगाल तर नाही ना? असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच रहदारीस अडथळा ठरणारी ही कार तात्काळ रस्त्यावरून हटविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.