हूलबत्ते कॉलनी शहापूर येथील महालक्ष्मी मंदिराजवळील नाल्यावर असणारा ठिकठिकाणी भगदाड पडलेला लोखंडी गंजका पादचारी पुल नागरिकांसाठी विशेष करून शाळकरी मुलांसाठी धोकादायक बनला असून महापालिकेने याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.
हुलबत्ते कॉलनी शहापूर येथील महालक्ष्मी मंदिराजवळील नाल्यावर नागरिकांना ये -जा करण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी एक लोखंडी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. सध्या सदर पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
पुलाचा पृष्ठभागाचा लोखंडी पत्रा पूर्णपणे गंजून गेला असून त्यावर ठिकठिकाणी लहान -मोठी भगदाडे पडली आहेत. पुलाच्या रेलिंगचे लोखंडी बार तुटून बाहेर डोकावत आहेत. या पुलापासून थोड्याच अंतरावर एक खाजगी शाळा असून त्या शाळेच्या विद्यार्थ्यांची या पुलावरून नेहमी वर्दळ असते.
पुलाची एकंदर अवस्था लक्षात घेता एखाद्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा पाय अनावधानाने पुलावरील गंजक्या भगदाडामध्ये पडून गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे. त्याप्रमाणे बाहेर डोकावणारे रेलिंगचे बार लागून मोठी इजा होऊ शकते. दिवसाढवळ्या या पुलावरील भगदाड दिसत असली तरी रात्रीच्या वेळी ये -जा करणाऱ्यांसाठी हा पूल अत्यंत धोकादायक ठरत आहे.
तेंव्हा महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी या पुलाची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी केली आहे.