बेळगाव : बेळगावमध्ये भरविण्यात आलेल्या कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काल एक दिवस आधीच गुंडाळण्यात आले. अनियमित काळासाठी सभागृह तहकूब केल्यानंतर आज बेळगावमध्ये सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली होती. या पत्रकार परिषदेत हिवाळी अधिवेशन यशस्वी झाल्याचे प्रतिपादन केले.
अधिवेशन काळात बेळगाव जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाने निवास, भोजन, वाहतुकीसह सर्व व्यवस्था उत्तम पद्धतीने केल्याबद्दल सभापतींनी कौतुक केले. बेळगावमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात ११ सत्रे झाली असून ९ दिवस चाललेल्या अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासनाने खूप मेहनत घेतली. अधिवेशन काळात करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल लोकप्रतिनिधींसह सर्वानीच प्रशासनाचे कौतुक केले.
अधिवेशन काळात सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रणाची जबाबदारी पोलीस विभागाने उत्तमरीत्या पार पाडली. अधिवेशन काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुशलतेने काम पाहिले. तसेच नोडल अधिकाऱ्यांनीदेखील सहकार्य केले. याबद्दल त्यांनी कौतुक केले. येत्या काही दिवसांत सुवर्णसौधमधील अंतर्गत ध्वनी, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छतेत सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या बोलताना म्हणाले, दरवर्षी अधिवेशन काळात येणाऱ्या अनुभवावरून सुरक्षा व वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून आगामी काळात आणखी चांगल्या उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कमी कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना इ पास वितरित करण्यासाठी मोफत सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. इतर जनतेला प्रवेशपत्रे वितरित करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ पाच काउंटर उभारण्यात आले होते. कोणतेही खासगी वाहन न वापरता शासकीय वाहनांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले. अधिवेशन काळात विधानसभा-विधानपरिषद अध्यक्ष, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे नीट व्यवस्था करणे शक्य झाल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला विधानसभा सचिव एम. के. विशालाक्षी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण बागेवाडी, अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त गीता कौलगी, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोबरद, माहिती विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.