बेळगाव : गेल्या एक वर्षापासून आरक्षणप्रश्नी होत असलेल्या पंचमसाली समाजाच्या मागणीसंदर्भात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत खुशखबर दिली आहे.
आरक्षणाच्या बाबतीत लिंगायत आणि वक्कलिगांसाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सरकार आणि पंचमसाली समाजातील संघर्ष मिटविण्यासाठी सुवर्णमध्य साधला आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३बी श्रेणीत असलेल्या लिंगायतांसाठी २डी आणि ३ए श्रेणीत असलेल्या वक्कलिगांसाठी २सी असा स्वतंत्र वर्ग तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आरक्षणप्रश्नी बोम्मई सरकारने घेतलेल्या स्मार्ट निर्णयामुळे दोन्ही समाजाचा रोष कमी झाला आहे. आरक्षणप्रश्नी स्वतंत्र वर्ग तयार करण्याचा निर्णय जरी झाला असला तरी आरक्षणाचा दर मात्र अद्याप जाहीर झालेला नाही.
येत्या काही दिवसांत आरक्षणाचे दर जाहीर करण्याचे ठरले आहे. कुडलसंगम पिठाचे बसवमृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली पंचमसाली समाजातील लोक वर्षभर तीव्र आंदोलन करत आहेत.
गेल्या आठवड्यात बसवजय मृत्युंजय स्वामींनी लाखो समाजबांधवांसह सुवर्णसौधला घेराव घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी बसवजय मृत्युंजय स्वामी आणि पंचमसाली समाजातील नेत्यांशी चर्चा करून २९ तारखेला योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. आज सकाळपासून मंत्रिमंडळ बैठकीकडे संपूर्ण पंचमसाली समाजाचे लक्ष वेधले होते. या बैठकीत आरक्षणाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आंदोलनाचा तिढा सुटला आहे.