बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलावर एक विचित्र अपघात गुरुवारी घडला आहे. चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली असून या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार चक्क २५ फूट उंचीवरून ब्रिजखाली कोसळला.
आज दुपारी १२:४५ च्या सुमारास बेळगाव शहरातील तिसऱ्या उड्डाण पुलावर घडलेल्या या घटनेत दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील नव्याने बांधलेल्या ओव्हर ब्रिजवर आज (गुरुवारी) दुपारी नेहमीप्रमाणे रहदारी सुरू होती. यावेळी १२:४५ वाजण्याच्या सुमारास ब्रिज वरून चुकीच्या बाजूने जाणाऱ्या एका भरधाव ओमनी कारने प्रथम एका दुचाकी स्वाराला धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटलेल्या त्या कारने पुढे जाऊन आणखी एका दुचाकीस्वाराला ठोकरले.
ओमनीने या दुसऱ्या दुचाकीस्वाराला दिलेली धडक इतकी जोराची होती की तो दुचाकीस्वार उडून ब्रिज वरून २० ते २५ फूट खाली कोसळला. यावेळी ओमनी कार दुचाकीला धडकून चक्क ब्रिजच्या संरक्षक भिंतीवर चढली होती. ब्रिज वरून उंचावरून खाली कोसळलेला तो दुचाकीस्वार केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावला असला तरी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे प्रत्यक्षदर्शींना त्याची स्थिती चिंताजनक वाटत होती.
या जखमी खेरीज सदर विचित्र अपघातात ओमनी चालकासह कारणे प्रथम धडक दिलेला दुचाकी स्वार हे दोघेही जखमी झाले आहेत. काळजाचा ठोका चुकविणारा हा विचित्र अपघात घडल्यानंतर घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती.
गंभीर जखमी दुचाकी स्वारासह अन्य दोघे अशा तिघांनाही उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रहदारी दक्षिण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.