कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून बेळगावमध्ये सुरू होणार असून 29 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनामुळे कर्नाटकाचा राज्यकारभार बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमधून चालणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून राज्याची राजधानीच बेंगलोरहून 10 दिवसांसाठी बेळगावमध्ये स्थलांतरित होणार आहे.
सदर दोन आठवडे चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे कामकाज पाच दिवसाचे आणि दुसऱ्या आठवड्याचे कामकाज पाच दिवसाच्या असणार आहे. हे अधिवेशन सुरळीत पार पाडावे यासाठी जवळपास 5000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत त्यांची निवासाची सोय वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची राहायची सोय वेगवेगळ्या मोठ्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. तसेच लहान दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवासाची सोय वेगवेगळे हॉटेल आणि लॉजमध्ये करण्यात आले असून यासाठी शहरातील जवळपास सर्वच लॉज आरक्षित करण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सुवर्ण विधानसौध परिसरामध्ये शामियाने उभारण्याद्वारे तेथे आंदोलनासाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. अधिवेशनाच्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास 63 आंदोलनं होणार असून 9 मोठे मोर्चे सुवर्ण विधानसौधवर येणार आहेत. बॅरिकेड्स वगैरे टाकून त्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
यावेळी जवळपास चार नवीन विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार असून वेगवेगळ्या मुद्यांसह उत्तर कर्नाटक येथील मुद्द्यावर चर्चा होणार आहे. विधानसभेचे सभापती (स्पीकर) म्हणून बसवराज होरट्टी यांची निवड करण्यात आली आहे. एकूणच पुढील दहा दिवस राज्याचा राज्यकारभार बेळगावमधून चालणार आहे. बेळगावचा सीमाप्रश्न असो किंवा सीमा प्रश्नसंदर्भातील घडामोडी असो, उत्तर कर्नाटकचा विकास असो किंवा सध्या चाललेल्या राजकीय घडामोडी या विषयी या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे.
उद्या 19 डिसेंबर अधिवेशनाचा पहिला दिवस असणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याची देखील जोरदार जय्यत तयारी करण्यात आली आहे. सदर मेळाव्यास इचलकरंजीचे खासदार आणि सीमाप्रश्नी नियुक्त तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने आणि मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील हे महाराष्ट्रातील दोन नेते मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
याखेरीज महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे अन्य नेतेही या मेळाव्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर हा महामेळावा होणार आहे. मात्र या मैदानावर मेळावा घेण्यास आणि तेथे शामियाना उभारण्यास बेळगाव महापालिकेकडून अद्यापपर्यंत तरी रीतसर परवानगी मिळालेली नाही.