सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थोडा जरी कमी करायचा असेल तर आपण स्वतः लाच देणे बंद केले पाहिजे. लाच देणे कमी झाल्यास लाच घेणे ही थांबेल, असे मत भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त आज गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देशात सर्वाधिक भ्रष्टाचार सध्या कर्नाटक राज्यात होत आहे. विद्यमान कर्नाटक सरकार तर 40 टक्के कमिशनचे सरकार म्हणून कुख्यात झाले आहे.
आज आपल्या देशातून कोरोना सारखा विषाणू नाहीसा झाला. मात्र भ्रष्टाचार गेल्या कित्येक वर्षापासून सुरूच आहे. त्याचे आजतागायत समूळ उच्चाटन झालेले नाही. सध्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराची परिसीमा झाली असून आगामी काळात जनतेने संघटितपणे त्याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे. जनतेने जोरदार आवाज उठवला तरच भ्रष्टाचाराची ही कीड थोड्या प्रमाणात का होईना पण कमी होईल आणि सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल.
सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी येत्या काळात प्रथम आपणच लाच देणे बंद केले पाहिजे, म्हणजे लाच घेणे ही थांबेल. शहरातील एका आमदाराविरुद्ध मी मोठ्या भ्रष्टाचाराची तक्रार केली आहे.
मात्र अद्याप त्यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्यात आलेले नाही. यावरून आपण परिस्थिती किती वाईट झाली आहे, याचा अंदाज बांधू शकतो असे सांगून जनतेने संघटितपणे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज बनली असल्याचे सुजित मुळगुंद यांनी स्पष्ट केले.