बेळगाव शहरातील लोक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांनी नव्या वर्षाची सुरुवात नव्या संकल्पनेसह नव्या दमाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज शनिवारी वर्षाखेरीस त्यांनी डोळ्याने अधू असलेल्या एका गरजू व्यक्तीला नेत्र तपासणी अंती चष्म्याच्या स्वरूपात मदत करून नवी दृष्टी दिली.
याबाबतची माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ हे आज शनिवारी सकाळी कोल्हापूर सर्कलनजीक नाश्ता करत असताना गंगाप्पा नामक भिक्षुकासारखा वाटणारा इसम त्यांच्या जवळ आला. तेंव्हा हिरेमठ यांनी त्याला नाश्ता देऊ केला.
मात्र त्याने तो नाकारून मला माझ्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत नाही, जमलं तर त्यासाठी काहीतरी करा अशी याचना हिरेमठ यांच्याकडे केली. वीरेश हिरेमठ यांच्यासाठी हा अनुभव नवीन होता. त्यांना तो इसम म्हणजे साक्षात परमेश्वराने सकाळी सकाळीच परीक्षा घेण्यासाठी पाठवलेल्या दूताप्रमाणे वाटला.
गंगप्पा नामक त्या इसमाची विचारपूस करून हिरेमठ यांनी तात्काळ कृती करताना त्याची डोळ्याची तपासणी करून त्याला नंबरचा चष्मा स्वखर्चाने घेऊन दिला. तद् नंतर गंगप्पाच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव व आनंद अश्रू आणि त्याने उच्चारलेले ‘गॉड ब्लेस यु’ हे अख्खलितपणे इंग्रजीतले वाक्य वीरेश यांना धक्का देऊन गेले.
एक मनोरुग्णाप्रमाणे भिक्षुक वाटणारा व्यक्ती ज्याला भिक्षेची गरज नव्हती तर गरज होती ती त्याची अडचण समजून माणूस दाखवण्याची ती पूर्ण होताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव व आशीर्वादासाठी वर गेलेला हात वीरेश हिरेमठ यांना आशीर्वाद व आत्मशांती देऊन गेला. तसेच त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात ही अशी गरजूंना दृष्टी देऊन नवे वर्ष व नवीन सृष्टी पाहता येईल अशी झाली.
आता यापुढे अशा प्रकारे गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणणारे कार्य करू असा संकल्प वीरेश हिरेमठ यांनी केला आहे. त्यांच्या या संकल्पला त्यांचे हितचिंतक व नागरिकांनी शुभेच्छा देऊन सुयश चिंतले आहे.