भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आयोजित देशातील 15 वर्षाखालील महिलांच्या ‘वन डे ट्रॉफी 2022 -23’ या राष्ट्रीय स्तरावरील एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याच्या संघात बेळगावच्या साक्षी मुनवळ्ळी आणि श्रेया पोटे यांची निवड झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे येत्या 26 डिसेंबर ते 3 जानेवारी 2023 या कालावधीत राजकोट येथे 15 वर्षाखालील महिलांची वन डे ट्रॉफी 2022 -23 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत देशातील विविध राज्यांच्या महिला संघांचा सहभाग असणार आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे या स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या कर्नाटक संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या संघात बेळगावची साक्षी मुनवळ्ळी आणि सुळगा गावची श्रेया पोटे या दोन होतकरू महिला क्रिकेटपटूंनी स्थान मिळवले आहे. साक्षी बरोबरच ग्रामीण भागातून आलेल्या श्रेया पोटे हिने अलीकडे क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी नोंदविले आहे. आता या दोघींची राष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
साक्षी ही शहरातील क्रिकेटप्रेमी नागरिक कुबेर मुनवळ्ळी आणि संगीता मुनवळ्ळी यांची कन्या आहे. त्याचप्रमाणे श्रेया ही सुळगा गावातील व्यावसायिक भोमाण्णा पोटे यांची कन्या आहे. श्रेयाचे फिटनेस कोच ओंकार मोटार हे असून प्रशिक्षक फिरोज शेख हे आहेत.
साक्षी मुनवळ्ळी आणि श्रेया पोटे यांना अविनाश पोतदार, दीपक चौगुले, प्रशिक्षक संगम पाटील, विवेक पाटील, परशराम पाटील, मिलिंद चव्हाण, प्रशिक्षक बाळकृष्ण पाटील, आनंद करडी, नागराज भगवंतनवर, विठ्ठल कुर्डेकर, सतीश मोरे, सुरेंद्र अनगोळकर, प्रमोद पालेकर आणि रोहित पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.