बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी याचिका अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्र सरकारची भक्कम बाजू पाहता कर्नाटक सरकारला आतापासूनच धास्ती लागली आहे. एकंदर परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने पळीचा डाव सुरू केला असून महाराष्ट्रातून येणाऱ्या सीमासमन्वयक मंत्र्यांना जाणीवपूर्वक प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
एकीकडे गुलाबपुष्प देऊन स्वागत करणारे एडिजीपी अलोक कुमार आणि दुसरीकडे करवेच्या म्होरक्यांचा टोलनाक्यावरील धुडघुस, दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या समिती नेत्यांना झालेली अटक ही एकंदर परिस्थिती पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटक सरकारने सीमाप्रश्नी सहकार्याची भूमिका न दाखवल्यास आपण स्वतः जातीने बेळगाव मध्ये हजर राहू असा इशारा दिलाय.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणं गरजेचं होतं. मात्र ती भूमिका घेतली जात नाही. येत्या २४ तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिका या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे.
बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांच्याशी समिती नेत्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असून सीमाप्रश्नी शरद पवार ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत. शरद पवार यांनी स्वतः जातीने बेळगावमध्ये हजर राहण्याची तयारी दाखवली असून त्यांच्या बेळगावमधील आगमनादरम्यान मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने स्वागातासाठी हजर राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.