बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे वारे जलदगतीने वाहू लागले असून इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय आज ग्रामीण मतदार संघात आमदार रमेश जारकीहोळीच्या शक्तिप्रदर्शनावरून आला. हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन आज माजी मंत्री आणि गोकाक मतदार संघाचे आम. रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत जल्लोषात करण्यात आले.
आम. रमेश जारकीहोळी यांच्याहस्ते फीत कापून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. नागेश मन्नोळकर यांचे बंधू रामचंद्र मन्नोळकर, भाजप ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, हिंडलगा ग्रामपंचायत उपाध्यक्षा भाग्यश्री यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण भागात भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असणार असून आमची ग्रामीण रणनीती मीडिया कडे सांगणार नसल्याचे सांगत 2023मध्ये भाजपा कसे सत्तेत बसेल यासाठी कार्यरत असणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना नागेश मन्नोळकर यांनी ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांवर तोफ डागली. ग्रामीण मतदार संघात १ लाखाहून अधिक मराठा समाजातील मतदार आहेत. शिवाय येथील स्थानिकच या भागातील समस्या जाणू शकतात. मतदार संघाबाहेरील उमेदवारांकडून आमिष दाखवून मतदारांना आकर्षित करण्याव्यतिरिक्त मतदार संघाच्या विकासाबद्दल किंचितही प्रयत्न करण्यात आला नाही, असा आरोप यावेळी केला. यावेळी ग्रामीण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन नागेश मन्नोळकर यांनी दिले.
यावेळी मोठ्या संख्येने भाजप समर्थकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ग्रामीण मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनाची चर्चा जोरदार सुरु आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या संपर्क कार्यालयाचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर यांच्या संपर्क कार्यालयाचे झाले उद्घाटन. मोठे शक्ती प्रदर्शन करत केलं उद्घाटन pic.twitter.com/Qw00ZYzOcM
— Belgaumlive (@belgaumlive) December 24, 2022