सीमा लढ्यातील अग्रणी शरद पवार यांचे नातू युवा नेते आणि महाराष्ट्रातील जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज बेळगावला अचानक धावती भेट दिली. याप्रसंगी त्यांनी मध्य. म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याबरोबरच विविध ठिकाणी भेटी देऊन सीमावासियांच्या भावना जाणून घेतल्या.
आज मंगळवारी सकाळी आमदार रोहित दादा पवार बेळगाव येथे दाखल झाले. प्रारंभी त्यांनी छ. शिवाजी उद्यानातील छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह इतर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी येळ्ळूर गावाला भेट दिली.
येळ्ळूर येथे त्यांनी सीमावासियांच्या भावना जाणून घेतल्या. येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे दुधाप्पा बागेवाडी, राजू पावले, वामन पाटील आदींनी आमदार पवार यांच्यासमवेत चर्चा केली. येळ्ळूर भेटीदरम्यान आमदार रोहित दादा पवार यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून नमन केले. त्यानंतर त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
आमदार पवार यांनी दळवी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटी प्रसंगी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या खटल्याबाबत दळवी यांच्याशी चर्चा केली. दळवी यांची भेट घेतल्यानंतर आमदार रोहित दादा पवार यांनी शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिराला भेट देऊन देव दर्शन घेतले. या ठिकाणी ॲड अमर येळ्ळूरकर यांनी त्यांचे स्वागत केले. मंदिरात आमदार पवार यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ते हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट देण्यासाठी रवाना झाले.
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी त्यांनी पुष्पचक्र वाहून 1 जून 1986 च्या आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, आर. एम. चौगुले आदी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी जी विकास कामे राबविण्यात येणार आहेत, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी यावेळी दिले.
एकंदर माननीय शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्यानंतर आता आमदार रोहित दादा पवार यांच्या स्वरूपात महाराष्ट्रातील पवार घराण्याची तिसरी पिढी सीमा लढ्यात अग्रणी झाली आहे. माननीय शरद पवार यांच्या सूचनेनुसार ते आज मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर आले होते. कोणालाच कानोकान खबर न करता आज मंगळवारी सकाळी अचानक बेळगाव येथे दाखल झालेल्या आमदार रोहित दादा पवार यांनी सीमावासियांच्या भावना जाणून घेत आपला दौरा यशस्वी केला.