बेळगाव लाईव्ह : मराठा समाजाचा ३बी मधून २ए मध्ये समावेश करा अशी मागणी हल्याळचे आमदार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी विधानसभेत केली. बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी मराठा समाजाने बेंगळुरू गोसावी मठाच्या श्री श्री मंजुनाथ स्वामींच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले होते. याचाच धागा धरून आज आर. व्ही. देशपांडे यांनी विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला.
कर्नाटकात सुमारे ७५ लाख म्हणजेच १६ टक्के समाज मराठा आहे. मराठा समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असून मराठा समाजाला सध्या ३बी श्रेणीत आरक्षण देण्यात आले असून या आरक्षणात बदल करून २ए श्रेणीत आरक्षण देण्यात यावे, राष्ट्रीय पक्षांनी मराठा समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे अशी मागणी मराठा समाजाच्यावतीने करण्यात येत आहे.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी कोंडुसकोप्प येथे हजारो मराठा समाज बांधवांनी एकत्रित येऊन आंदोलन छेडत निदर्शने केली. आज विधिमंडळ अधिवेशनात आर. व्ही. देशपांडे यांनी हा मुद्दा उचलून धरत मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कायमस्वरूपी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालासंदर्भात माहिती देत आरक्षणप्रश्नी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येणे बाकी असल्याचे सांगितले.
अहवाल आल्यानंतर सर्व बाबींचा विचार करून अभ्यास समितीची पुनर्र्चना करण्यात येईल, आणि योग्य निर्णय घेऊन आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले.