बेळगाव लाईव्ह : भाषावार प्रांतरचनेत अन्यायाने कर्नाटकात डांबलेला सीमाभाग, गेली ६७ वर्षे सीमावासीयांवर कर्नाटक सरकारची होत असलेले अत्याचार, जुलूम याविरोधात सीमाभागातील मराठी जनतेने एल्गार पुकारत आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ‘चलो कोल्हापूर’ची हाक देत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
आजवर महाराष्ट्रातील नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांमध्ये एकी नसल्याचे आरोप केले. मात्र आज महाराष्ट्र एकीकरण समितीसह संपूर्ण सीमाभाग एकजुटीने कोल्हापूरला धडकला.
यावेळी माजी महापौर मनोहर किणेकर यांनी बोलताना, आपल्यात एकी असून आज संपूर्ण सीमाभागातील जनता महाराष्ट्राकडे एकजुटीने आल्याचे सांगितले.
कर्नाटकाकडून होत असलेले अत्याचार आणि महाराष्ट्र सरकारची बघ्याची भूमिका यामुळे सीमावासीय मराठी भाषिक पोरका झाला आहे. येथील मराठी भाषिकांना कुणीच वाली नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून आज सीमावासीयांनी महाराष्ट्र सरकारकडे याप्रश्नी दाद मागत आपल्या अन्यायाचा पाढा वाचला.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात असून आगामी निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे किमान तीन आमदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकात येऊन निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ नये, असा सल्ला मनोहर किणेकर यांनी दिला.