नूतनीकरणाद्वारे कायापालट झालेल्या बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाच्या (सीबीटी) उद्या मंगळवार दि 27 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी करण्यात येत असून बस स्थानकाच्या आवारात भव्य शामियाना उभारण्यात येत आहे.
बेळगाव केंद्रीय बस स्थानकाचा फलकावर मात्र मराठीला बगल देण्यात आली असून कन्नड आणि इंग्लिश मध्ये फलक उभारण्यात आला आहे त्यामुळे उद्घाटनांच्या दिवसापासूनच मराठी भाषिकांची गैरसोय होणार आहे.
नूतनीकरण करून आधुनिक स्वरूप दिलेल्या बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाच्या (सीबीटी) उद्घाटनासह लोकार्पण सोहळा उद्या मंगळवार दि 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी बेळगावातील हिवाळी अधिवेशनास उपस्थित जवळपास सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. भव्य प्रमाणात करण्यात येणाऱ्या समारंभाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने बस स्थानक आवारात मोठा शामियाना उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे स्वागत कमान उभारून सुशोभीकरण करण्यात येत आहे.
बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानक (सीबीटी) नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात 28 जानेवारी 2017 रोजी झाली होती. हे नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला दोन वर्षाची मुदत देण्यात आली होती. मात्र तसे न घडता 5 वर्षे उलटल्यानंतर आता या बस स्थानकाचे उद्घाटन केले जात आहे. बसस्थानक कार्यान्वित करण्यासाठीच्या मूलभूत पायाभूत सुविधा आणि स्थानकाची इमारत सध्या तयार असली तरी अन्य काही कामे पूर्ण होणे बाकी आहेत.
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक नूतनीकरणासाठी 32,48,54,759.59 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून या कामाचे कंत्राट मन्साराम विक्रम पवार (हर्षा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड) यांना देण्यात आले आहे. त्यांच्याकडून जुन्या बस स्थानकाचे आधुनिक बस स्थानकात रूपांतर करण्यात आले आहे. आधुनिक स्वरूप प्राप्त झालेल्या बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकावर बसेसच्या पार्किंग व वर्दळीच्या जागे बरोबरच एकूण 41 बस फलट आहेत.
त्याचप्रमाणे ऑटो रिक्षा लेन, टॅक्सी पार्किंग लेन, खाजगी वाहनांसाठी बेसमेंट पार्किंग, प्रवाशांसाठी आगमन व प्रस्थानद्वार, बस स्थानकाच्या टर्मिनल इमारतीमध्ये प्रवाशांसाठी वेटिंग एरिया, तिकीट /रिझर्वेशन काउंटर्स, क्लॉक रूम, प्रथमोपचार कक्ष, वेटिंग रूम, प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, यात्री निवास आदी सुविधा, उपहारगृह, दुकाने, प्रशासकीय कार्यालय, पार्सल ऑफिस वगैरेंची सोय करण्यात आली आहे.