बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकारण्यांनी मतदारसंघ काबीज करण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू केली असून आमदार रमेश जारकीहोळी यांनी विरोधकांना टक्कर देण्यासाठी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात तळ ठोकला आहे. ग्रामीण मतदार संघातील राजकीय शत्रू असलेल्या विरोधकांना आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी रमेश जारकीहोळी यांनी पक्ष संघटनावर भर दिला आहे.मागील आठवड्यात त्यांनी हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मननोलकर यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेत ॲक्टीव्ह झाल्याचे संकेत झाले होते.
ग्रामीण मतदार संघातील हिरेबागेवाडी, हलगा, के के कोप्प, बडाल अंकलगी यासह दहाहून अधिक गावांना भेटी देऊन पक्ष संघटनेकडे भर दिला आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार आणि रमेश जारकीहोळी यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवीन नाही. मागील निवडणुकीत रमेश जारकीहोळी यांनी राजकीय द्वेषामुळे सरकार पाडल्याचे उदाहरण आपल्यासमोर आहे.
आता पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या राजकारणात हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवाय आमदार रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांना आगामी निवडणुकीत पराभूत करण्याचा निर्धार केला आहे.
मागील आठवड्यात रमेश जारकीहोळी यांनी पूर्व भागातील सांबरा, मोदगा, पंत बाळेकुंद्री, मारीहाळ यासह विविध गावांना भेटी देऊन तेथील स्थानिक राजकीय नेत्यांची भेट घेत एकजूट सुरू केली आहे, ग्रामीण भागात मराठा समाजाची मते वाढल्याने मराठा समाजातील नेत्यांनाही एकत्रित घेऊन पक्ष संघटनेकडे भर दिला आहे. हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेत राजकीय डावपेच आखल्याची चर्चाही रंगली आहे.
ग्रामीण मतदार संघाच्या आमदार आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्या राजकीय संघर्षाची माहिती सर्वश्रुत आहे. 2018 साली झालेल्या निवडणुकीत रमेश जारकीहोळींनी ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांना पाठिंबा दर्शविला. मात्र, काही कारणास्तव दोघांमधील वैर राजकीय पातळीवरील संघर्षाचे कारण बनले आहे. एकेकाळी ग्रामीण मतदारसंघाच्या आमदारांसाठी धावून आलेल्या रमेश जारकीहोळी यांनी आगामी निवडणुकीसाठी त्यांच्याच पराभवासाठी ग्रामीण मतदारसंघात तळ ठोकला आहे, ही बाब बेळगावच्या राजकारणासाठी मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या विजयाचा तुरा कुणाच्या शिरपेचात रोवला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.