बेळगाव महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांचा मोठा घोळ झाला होता. हयात नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली नव्हती, जे मतदार हयात आहेत त्यांची नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्टच नव्हती, काहींच्या कुटुंबातील मोजक्याच सदस्यांची नावे मतदार यादीत आढळून आली तर काहींची नावेच मतदार याद्यांमधून गायब झालेली होती.
याचप्रमाणे एका मतदार संघातील सदस्यांची नावे दुसऱ्या मतदार संघात समाविष्ट करण्यात आली होती. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप आजवर अनेकवेळा करण्यात आला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने जागरूकपणे मतदार याद्यांसंदर्भात जागरूक राहावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
गेल्या अनेक निवडणुकांपासून मतदार याद्यांचा घोळ कायम आहे. सुधारित मतदार याद्यांसाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. वेळोवेळी सूचना करण्यात आल्या. मात्र आजपर्यंत मतदार याद्यांमध्ये सुधारणा झालीच नाही. यामुळे अनेक मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित रहात आहेत.
मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रत्येक मतदाराने, प्रामुख्याने तरुण पिढीने जागरूक राहून आजच आपले नाव नोंदवावे, १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत,. मतदार यादीमधील आपली माहिती अपडेट करण्यासाठी ८ डिसेंबर पर्यंतचा अवधी देण्यात आला असून नजीकच्या सरकारी शाळेत हे कामकाज सुरु राहणार आहे.
यामुळे आपल्या भागातील लोकप्रतिनिधी किंवा पुढाऱ्यांशी संपर्क साधून मतदार यादीसंदर्भातील आपल्या नावाची शहानिशा करून घ्यावी, आपल्या नावासंदर्भातील माहितीमध्ये बदल करावयाचा असल्यास तर तो दिलेल्या अवधीच्या आत करून घ्यावा, असे आवाहन देखील रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.
शिवाय मतदार याद्यासंदर्भात अडचण असल्यास श्रीराम सेना हिंदुस्थानच्या गोवावेस येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.