कर्नाटक पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक नुकतेच जाहीर केले असून वार्षिक परीक्षा येत्या 9 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील 21 हजार 483 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
बारावीच्या परीक्षेला तीन महिन्यांचा कालावधी असला तरी शिक्षण खात्याने परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या उपाययोजनांसाठी तेथील सुविधांची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना केली जाणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून गतवर्षी कोरोना व इतर कारणांमुळे कांही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले होते. त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी अर्ज दाखल केले असून यावेळी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी शिक्षण खात्याने तीन वेळा परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ दिली होती.
गेली 2 वर्षे दहावीच्या परीक्षेनंतर बारावीची परीक्षा घेतली जात होती. मात्र यावेळी बारावीची परीक्षा लवकर घेण्यात येणार असून एप्रिल 2023 मध्ये दहावीची परीक्षा होणार आहे. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील 21 हजार 483 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
आगामी बारावी परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे. 9 मार्च : कन्नड. 11 मार्च : गणित, शिक्षण. 13 मार्च : अर्थशास्त्र. 14 मार्च : रसायनशास्त्र, मानसशास्त्र, कर्नाटक संगीत, हिंदुस्तानी संगीत, मूलभूत गणित. 15 मार्च : प्रथम भाषा परीक्षा (तमिळ, तेलगू, मल्याळम, मराठी, उर्दू, संस्कृत, फ्रेंच). 16 मार्च : तर्कशास्त्र, व्यवसाय अभ्यास.
17 मार्च : माहिती तंत्रज्ञान, रिटेल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, ब्युटी अँड वेल्नेस. 18 मार्च : भूगोल, जीवशास्त्र. 20 मार्च : इतिहास, भौतिकशास्त्र. 21 मार्च : हिंदी. 23 मार्च : इंग्रजी. 25 मार्च : राज्यशास्त्र, संख्याशास्त्र. 27 मार्च : ऐच्छिक कन्नड, लेखा, भूमी विज्ञान, गृहविज्ञान. 29 मार्च : समाजशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान.