बेळगाव : न्यू वंटमुरी येथे सासरच्या मंडळींनी गौरम्मा मंजुनाथ कोण्णूर या विवाहितेचा खून करून आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी देखील दुर्लक्ष केले. यापार्श्वभूमीवर आज कर्नाटक रक्षण वेदिकेच्या स्वाभिमानी गटाने न्यू वंटमुरी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
बेळगावचे अपर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करत सासरच्या मंडळींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी आणि याप्रकरणी कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली.
यावेळी करवे संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वरगौडा पाटील, कामगार नेते ऍड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली न्यू वंटमुरी ग्रामस्थ उपस्थित होते. कन्नड साहित्य भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सदर घटनेचा निषेध नोंदविला.
शनिवारी घडलेल्या प्रकारानंतर ८ दिवस होत येऊनही पोलिसांनी कोणतीच कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. एफआयआरदेखील नोंदविण्यात आली नाही. सदर विवाहितेवर अनेकवेळा सासरच्या मंडळींकडून मानसिक, शारीरिक जाच केला जायचा. अनेकवेळा ती आपल्या माहेरी जायची आणि प्रत्येकवेळी तिची समजूत काढून पुन्हा सासरी पाठवून दिलं जायचं. सध्या ती ३ महिन्यांची गर्भवती होती.
अशा अवस्थेत तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिचा खून करण्यात आला. हा प्रकार लपविण्यासाठी सासरच्या मंडळींनी हि आत्महत्या असल्याचे भासविण्यासाठी विवाहितेचा मृतदेह फासावर लटकावला. यानंतर तिचा पती मंजुनाथ, सासरा यल्लाप्पा कोण्णूर आणि सासू रेणुका कोण्णूर हे तिघेही खुलेआम फिरत आहेत.
२४ डिसेंबर रोजी तक्रार देऊनही अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. सदर आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, आणि याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.