मराठी भाषिकांचा महामेळावा झाला नसला तरी पोलिसांना अद्यापही मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची धास्ती कायम आहे. त्यामुळेच आज तिसऱ्या दिवशीही व्हॅक्सिन डेपो मैदान आणि दुसऱ्या रेल्वे गेट या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहावयास मिळाला.
बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगाव येथे सुवर्णशोध उभारली आहे. त्याचप्रमाणे सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सरकारकडून त्या ठिकाणी अधिवेशन भरविले जात आहे. त्यामुळे याला विरोध दर्शनासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांतर्फे प्रतिअधिवेशन अर्थात महामेळावा भरवला जातो.
त्यानुसार यंदाही या महामेळाव्याचे आयोजनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने ऐनवेळी परवानगी नाकारण्याबरोबरच पोलीस बळाचा वापर करत लोकशाहीची तत्वे पायदळी तुडवत मराठी भाषिकांचा मेळावा उधळून लावला.
गेल्या सोमवारी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांची धरपकड करून महामेळावा होऊ दिला नाही. लोकशाहीच्या तत्वांना काळीमा फासणाऱ्या आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या या कृतीचा समिती नेते व कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. त्याचप्रमाणे एपीएमसी पोलीस ठाण्यासमोर अन्नत्याग करून धरणे आंदोलनही केले.
कर्नाटक सरकारच्या दडपशाहीची महाराष्ट्र विधानसभेतही पडसाद उमटली. आता या गोष्टींना दोन दिवस उलटले असले तरी पोलिसांनी अद्यापही मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची धास्ती घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज बुधवारी तिसऱ्या दिवशीही व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
येथील रस्त्यांवरील बॅरिकेड्स अद्याप पूर्णपणे काढण्यात आलेले नाहीत. त्याचप्रमाणे या मैदानाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी दोन पोलीस बसेस आणि पोलिसांच्या जीप गाड्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.