प्रशासनाला निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक केल्यामुळे ग्रामीण भागात संतापाची लाट उसळलेली आहे.उचगाव येथे लागलीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त साठी गाड्या हजर झाल्या आहेत.
महाराष्ट्र सीमा समन्वयक मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावर बंदी घातल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या समिती कार्यकर्त्यांना आज अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे कर्नाटकी प्रशासनाचा उद्दामपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्रातील येणाऱ्या आमच्या नेत्यांची अडवनूक करू नका या मागणीसाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही बातमी लागलीच संपूर्ण सीमा भागामध्ये पसरल्याने ग्रामीण भागातील सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करून कर्नाटकी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.
समितीच्या नेत्यांना अटक केल्यामुळे पश्चिम भागातील हिंडलगा सुळगा आंबेवाडी मन्नुर गोजगा कलेहोळ तुरमुरी बाची कोणेवाडी अतिवाड बसुरते हंगरगा मंडोळी सांगाव बेनकनळी आदी गावातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची निषेधाची लाट उसळलेली आहे.
त्यामुळे कर्नाटक सरकारने मराठी जनतेची गळचेपी करू नये अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातून संतापाची लाट उसळलेली असताना उचगाव येथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असून पोलिसांच्या गाड्या उचगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये निषेध व्यक्त होत आहे.