बेळगाव पोलीस प्रशासनाने कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या उद्या सोमवारी पहिल्या दिवशी होणाऱ्या आंदोलनाची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाबरोबरच आता पोलीस प्रशासनाने ही या मेळाव्यास परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटक राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या उद्या सोमवारी पहिल्या दिवशी बस्तवाड येथे एक आंदोलन तर कोंडसकोप्प जवळ दोन आंदोलने होणार आहेत. याव्यतिरिक्त व्हॅक्सिन डेपो मैदानावरील मराठी भाषिकांचा महामेळाव्याचा प्रत्यक्ष उल्लेख न करता शहर परिसरातील एक आंदोलन अशी एकूण चार आंदोलनं उद्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे जाहीर केले आहे.
एकंदर मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यास सशर्त परवानगी मिळाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
दुपारी कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी महामेळाव्यात सहभागी होणाऱ्या लोकांना आम्ही अडवणार नाही घटनेने दिलेल्या अधिकारानुसार ते आंदोलन करू शकतात मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना महा मेळाव्यात सहभागी व्हायला देणार नाही असे म्हंटले होते त्याच वेळी समितीच्या महा मेळाव्याच्या परवानगीचा मार्ग मोकळा झाला होता तसे असेल तरी अद्याप लेखी परवानगी सायंकाळी सात पर्यंत समितीकडे मिळाली नव्हती.