प्रभाग क्रमांक १२ मध्ये येणाऱ्या वीरभद्र नगर येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात मनपाने आराखडा तयार केला असून सदर कचरा प्रकल्पाचे कामकाजही सुरु करण्यात आले आहे. या कचरा व्यवस्थापन प्रकल्पला विभद्रनगरवासियांनी तीव्र विरोध दर्शवत याठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्प करू नये अशी आग्रही भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे.
वीरभद्रनगर येथील नियोजित प्रकल्पस्थळी शुक्रवारी येथील रहिवाशांनी भेट देत कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सामूहिकहीत्य विरोध केला. बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग प्रभाग क्र. १२ मध्ये येणाऱ्या वीरभद्रनगर येथील मनपाच्या खुल्या जागेवर कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा निर्णय बेळगाव महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र, या प्रकल्पामुळे या भागात वाहतुकीची समस्या तसेच प्रदूषण आणि दुर्गंधीची समस्या निर्माण होणार असून याविरोधात स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी पालिकेने आराखडा तयार करून कॉलम उभारणी देखील सुरु केली आहे. कोणालाही कल्पना न देता अचानक याठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा फलक लावून कामाला प्रारंभ करण्यात आल्याने याविरोधात आज वीरभद्रनगर येथील रहिवासी एकवटले. न्यू वीरभद्रनगर डबल रोड परिसरात महापालिकेच्या मालकीची खुली जागा आहे.मात्र या जागेसंदर्भात न्यायालयात खटला सुरु आहे. याच जागेवर कचरा व्यस्थापन प्रकल्प सुरु करण्याचा घाट घालण्यात आल्याने येथील रहिवासी संतापले आहेत.
उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनीच या कामकाजाचा शुभारंभ केला आहे. या परिसरातच शाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जैन मंदिर, प्रार्थनास्थळ आहे. याठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु केल्यास वाहतुकीची समस्या उद्भवेल, आबालवृद्धांना या मार्गावरून जा-ये करण्यास अडचणी निर्माण होतील, अशी तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. केवळ वीरभद्र नगरचा नाही तर शिवबसव नगर, रामनगर, अझमनगर, आसदखान कॉलनी, सुभाषनगर आदी परिसरातील नागरिकांनी देखील आज वीरभद्रनगर येथे येऊन प्रकल्पाला विरोध दर्शविला.
कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प सुरु होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. यावेळी युनूस मोमीन, दावची, इस्माईल आदींसह अनेक स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.