नव्याने बांधण्यात आलेली बेळगाव पोलीस आयुक्तालय इमारत आणि आरएलएस कॉलेज शेजारील सिटी पोलीस लाईनचा उद्घाटन समारंभ आज बुधवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते थाटात पार पडला.
सदर 17 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ गेल्या 1 डिसेंबर 2020 रोजी स्वतः बोम्मई यांच्याच हस्ते ते राज्याचे गृहमंत्री असताना झाला होता. बेळगाव पोलीस आयुक्तालय गेल्या 1 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आले जेंव्हा आयजीपी भास्करराव हे बेळगावचे पहिले पोलीस आयुक्त होते.
प्रारंभी पोलीस आयुक्तांसाठी स्वतःचे कार्यालय नसल्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात ते सुरू करण्यात आले होते.. तेंव्हा ते कार्यालय संगोळी रायण्णा सर्कल येथील अर्धवट अवस्थेतील पोलीस जिमखाना इमारतीमध्ये हलविण्याचा विचारही करण्यात आला होता. मात्र तो प्रत्यक्षात उतरला नाही. त्यामुळे नूतन इमारतीतील पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन म्हणजे बेळगावच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणारी घटना म्हणावी लागेल.
बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील विध्वंसक कृत्य रोखण्यासाठी पोलीस खात्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले. यासाठी घटना घडल्यानंतर वेगाने सूत्र हलवून गुन्हेगारांना अटक करावी असे सांगून कायदा -सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण्यासाठी जनसंपर्क वाढवून नागरिकांशी निकटचा संबंध ठेवणे किती महत्त्वाचे आहे.
यावर मुख्यमंत्र्यांनी जोर दिला. विध्वंसक कृत्य घडल्यानंतर 24 तासात गुन्हेगारांना गजाआड करण्याच्या राज्य पोलिसांच्या कृतीची त्यांनी प्रशंसा केली. पोलीस दल अधिक बळकट करण्यासाठी तसेच पोलिसांसाठी 25 घरे आणि 116 पोलीस स्थानक बांधणे, या खेरीज विभिन्न स्तरावरील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना वाहनांची तरतूद करणे, यासाठी राज्य सरकारने कांही पावले उचलली आहेत असे सांगून आपण गृहमंत्री असताना बांधकाम सुरू करून अवघ्या वर्षभरात उभारण्यात आलेल्या इमारतीतील राज्य पोलीस गृहनिर्माण आणि मूलभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यक्षमतेवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रकाश टाकला.
बेळगाव शहराच्या नव्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या लोकार्पण pic.twitter.com/fjBSiH8vXh
— Belgaumlive (@belgaumlive) December 28, 2022