बेळगाव लाईव्ह : चीनमध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा संसर्गासंदर्भात भारतातही दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत असे निर्देश दिले असून त्यासाठी यापूर्वीच कार्यवाही झाली असल्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना डॉ. के. सुधाकर म्हणाले की, चीन आणि जपानसह काही देशांमध्ये कोविडची प्रकरणे अधिक आहेत. चीनमध्येही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लसीचा तिसरा डोस घेण्यास प्राधान्य द्यावे. केंद्र सरकारने नवीन बाधित व्यक्तींचे नमुने जीनोम सिक्वेन्स चाचणीसाठी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर काही खबरदारीच्या उपाययोजना कराव्या लागतील. बंगळुरू विमानतळावर सर्वाधिक प्रवासी येतात. येथेही देखरेख सुरू करण्यात येणार आहे. दोन डोसमध्ये १०० टक्के यश मिळाले असून अनेकांनी अद्याप तिसरा डोस घेतला नाही. ज्यांनी तिसरी लस घेतली नाही त्यांनी पुढाकार घेऊन लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोविडबाबत कारवाई केली जाईल. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार असल्याचेही डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.