कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावातील हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजल्यामुळे शहरातून राज्यातील सर्व मंत्री आमदार नाहीसे होण्याबरोबरच किल्ला तलावा नजीकच्या सर्वात उंच ध्वजास्तंभावरील राष्ट्रध्वज देखील गायब झाला आहे. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्य माणसाची चेष्टाच आहे.
बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या 9 दिवसांच्या काळात किल्ला तलाव येथील सर्वात उंच ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता. अधिवेशन समाप्त होऊन सर्व मंत्री, आमदार आपापल्या मतदार संघात परतून बेळगावातून गायब होताच तिरंगा ध्वजही नाहीसा झाला आहे.
अधिवेशन समाप्त होताच हा राष्ट्रध्वज काल गुरुवारी सायंकाळी ध्वजस्तंभावरून खाली उतरवण्यात आला. त्यामुळे राष्ट्रभक्ती दर्शविण्यासाठी किंवा बेळगाव
शहरवासीयांसाठी नव्हे तर अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या मंत्री, आमदार तसेच इतर मान्यवरांसमोर फक्त दिखावा करण्यासाठी तो फडकवण्यात आला होता हे उघड झाले आहे.
त्याचप्रमाणे सत्तेत अथवा प्रशासनामध्ये राहून ‘हम करे सो कायदा’ म्हणणाऱ्यांसमोर सर्वसामान्य जनता किती हतबल -शक्तीहीन आहे हे या प्रकारावरून प्रकर्षाने जाणवते.