बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारविरोधात निषेधाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात अवमानकारक वक्तव्य केले
असून याविरोधात आज महाराष्ट्रातील विधिमंडळ अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरून शिंदे सरकार आणि कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार कुंभकर्णाप्रमाणे गाढ झोपी गेल्याचा आरोप करत हातात फलक घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी निषेध व्यक्त केला.
‘कर्नाटक सरकार मुजोरी करतंय आणि महाराष्ट्र सरकार कुंभकर्णाप्रमाणे घोरताय’ असे आरोप करत सीमाप्रश्नी सत्ताधाऱ्यांकडून सोयीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला.
‘बेळगाव, कारवार आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे..’, ‘बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे..’ ‘सरकार हमको दबाती है, कर्नाटक को घाबराटी है..’, कुंभकर्णाने घेतलं झोपेचं सोंग.. तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब..’, ‘कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध’, ‘लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘सीमाप्रश्नी भूमिका घ्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.