बेळगाव लाईव्ह : मंगळवारी महाराष्ट्र विधिमंडळात सीमाप्रश्नी ठराव मंजूर झाल्यानंतर कर्नाटकातील नेतेमंडळी बिथरली असून कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी मुंबईबाबत बेताल वक्तव्य केलंय. केंद्रशासित प्रदेशाबद्दल बोलायचे असल्यास सर्वप्रथम मुंबई केंद्रशासित करावी, मुंबईत मराठी भाषिकांची संख्या कमी आहे, जर यावर उत्तर द्यायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना उत्तर देणं अडचणीचं ठरेल, अशापद्धतीने बरळत बेताल वक्तव्ये केली असून त्यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्र विधानभवनात उमटले आहेत.
अश्वथ नारायण यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळी आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्राचीच असून कोणाच्या बापाची नसल्याचं ठणकावून सांगितलंय. कानडी मंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकाला तंबी देण्यासाठी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचा इशारा दिला. कर्नाटकचे असले प्रकार खपवून घेऊ नका, त्यांना सक्त ताकीद द्या, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करणारे अश्वथ नारायण हे मूर्ख असून मुंबईतील कानडी लोकांवर कर्नाटकाप्रमाणे अत्याचार केले जात नसल्याचे सांगत संजय राऊत यांनी कर्नाटकाला खडे बोल सुनावले आहेत.
सीमाभागातील लोकांचं कर्नाटक सरकारनं अनेक प्रकारांनी दमण केल्याचं संजय राऊत यांनी बोलताना म्हटलं आहे. याव्यतिरिक्त आदित्य ठाकरे यांनीही खरपूस समाचार घेत अश्वथ नारायण यांची खरडपट्टी काढली आहे.