सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल आणि आयसीयुचे उद्घाटन करताना मला आज आनंद होत आहे. या सुविधांमुळे बेळगावचे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा केंद्रात परिवर्तन होण्याबरोबरच खास करून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना त्याचा लाभ होईल. मात्र हे साध्य करण्यासाठी बीम्सचे संचालक आणि अन्य अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.
बेळगाव बीम्स हॉस्पिटल आवारातील नूतन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन तसेच माता आणि बालक सुश्रुषा रुग्णालय (मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल) तसेच अतिदक्षता विभागाचा (आयसीयू) आज शुक्रवारी सकाळी पायाभरणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई बोलत होते.
यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी फक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल आणि आयसीयु विभागच नव्हे तर या खेरीज बेळगावमध्ये अतिरिक्त 650 बेड्सचे हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आमदारांनी बेळगाव शहरासाठी एक नर्सिंग कॉलेज मंजूर करावे अशी विनंती देखील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना केली.
बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या (बीम्स) आवारात येत्या 11 महिन्यात 1364 लाख रुपये खर्चाच्या 50 बेड्सच्या क्रिटिकल केअर युनिट विभागाची इमारत उभारण्यात येणार आहे.
आराखड्यानुसार या इमारतीच्या तळमजल्यावर गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी 5 बेड्स आणि प्रसुतीसाठी आलेल्या महिलांसाठी 2 बेड्स असणार आहेत. पहिल्या मजल्यावर डीएचयु -6 बेड्स, डायलेसिस -3 बेड्स, आयसोलेशन रूम -2 बेड्स आणि 24 बेड्सचा आयसोलेशन वार्ड असणार असून दुसऱ्या मजल्यावर आयसीयू -10 बेड्स, प्रीओपी -2 बेड्स, पोस्ट ओपी -2 बेड्स असे एकूण 52 बेड्स क्रिटिकल केअर युनिटच्या इमारतीत असणार आहेत.
याव्यतिरिक्त बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या आवारात आवारात 100 बेड्सचे मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमुळे बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील माता आणि बालकांना उत्तम दर्जाची आवश्यक आरोग्य सेवा सुश्रुषा उपलब्ध होणार आहे.