बेळगाव : फिरत्या पशु चिकित्सालय वाहनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याचे मंत्री प्रभू चव्हाण यांनी दिली.
यासाठी सुरु असलेली टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. या वाहनावर एक पशुवैद्य, एक तांत्रिक कर्मचारी आणि वाहनचालक कम डी ग्रुप कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. यावर काम करणाऱ्यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीवर केली जाणार आहे, अशीही माहिती प्रभू चव्हाण यांनी दिली.
एस. रवी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पशुसंगोपन मंत्र्यांनी हि माहिती दिली आहे. पशुसंजीवनी योजना जारी करण्यात आली असून या योजने अंतर्गत १५ रुग्णवाहिकाही खरेदी करण्यात आल्या आहेत.
जनावरांचे आरोग्य आणि रोग नियंत्रण या कार्यक्रमांतर्गत २७५ फिरती पशुचिकित्सा वाहने खरेदी केली आहेत. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पशुवैद्य आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हि फिरती चिकित्सालये शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन आपत्कालीन सेवा देतील. या सेवेला लवकरच सुरुवात होईल. असे प्रभू चव्हाण म्हणाले.
सध्या ४०० पशुवैद्यांच्या जागा रिक्त असून या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी ८ मार्च २०२२ रोजी अधिसूचना जारी केली आहे.
उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासह मूळ कागदपत्रांची तपासणी देखील करण्यात आली आहे. कन्नड माध्यामध्या उमेदवारांची कन्नड भाषेतून परीक्षा घेण्यात आली आहे. तसेच पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येत असल्याचेही प्रभू चव्हाण यांनी सांगितले.