बेळगाव लाईव्ह : गेली ६७ वर्षे सॆभागात तिष्ठत असलेला सीमावासीय महाराष्ट्रात जाण्यासाठी तळमळत आहे. बडेजाव, प्रसिद्धी, परतावा या कशाचीही अपेक्षा न करता केवळ आणि केवळ सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ‘डू ऑर डाय’ या भूमिकेतूनच झगडत आहे. कर्नाटकी अत्याचाराला वैतागून आज महाराष्ट्र सरकारसमोर आपली भूमिका मांडण्यासाठी गेलेल्या सीमावासीयांनी पुन्हा एकदा याची जाणीव करून दिली आहे.
सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याद्वारे सीमावासियांचा बुलंद आवाज कोल्हापुरात गुंजवणाऱ्या म. ए. समिती नेते व कार्यकर्त्यांसह मराठी बांधवांनी तेथील सर्वपक्षीय नेत्यांचा पाहुणचार न स्वीकारता स्वतः सोबत नेलेल्या अन्नाच्या शिदोरीचा आस्वाद घेत दुपारनंतर कोल्हापूरचा आनंदाने निरोप घेतला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या 19 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने दडपशाही करत परवानगी नाकारली. तसेच कोल्हापुरातून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही मेळाव्याला येण्यापासून रोखण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी, तसेच सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बृहत धरणे आंदोलन छेडण्यात आले. सदर आंदोलनासाठी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेकडो सीमाबांधव मोटरसायकल, कार तसेच मिनी बस, टेम्पो यासारख्या खाजगी प्रवासी वाहनांनी भगवे झेंडे घेऊन कोल्हापुरात दाखल झाले होते.
या सर्वांची संपूर्ण जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी गेल्या शनिवारी कोल्हापूर भेटीस गेलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांसमोर दर्शवली होती. मात्र त्यावेळी आम्ही चिरमुरे खाऊन सीमा आंदोलन धगधगते ठेवले आहे. तेंव्हा जेवणाची चिंता नको. आमचे लोक खाण्याची शिदोरी सोबत घेऊन येणार आहेत. जेवणाची व्यवस्था वगळता आंदोलनासाठी आवश्यक उर्वरित तयारी तुम्ही करा, असे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आदींनी कोल्हापूरच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यानुसार आज सोमवारी दुपारी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालया नजीकच्या एका उद्यानात बसून आपल्या सोबत नेलेल्या शिदोरीचा आस्वाद घेतला.
मध्यवर्तीय म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, एम. जी. पाटील, दीपक पावशे भागोजी पाटील, महादेव मंगणाकर, विनोद आंबेवाडीकर, पांडुरंग पट्टण, बाबू कोले, मारुती मरगण्णाचे, गोपाळ हंडे आदींनी सोबत आणलेली शिदोरी वाटून खात आज छेडलेले आंदोलन आणि भावी आंदोलनाबद्दल मोघम चर्चा केली.
या सर्वांखेरीज बेळगावसह सीमाभागातून गेलेले कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी उद्यानात गटागटाने बसून आपल्या शिदोरीतील भाकरी, भाजी, चपाती वगैरे खाद्यपदार्थांचे आदान प्रदान करत सहभोजन केले. तसेच सहभोजना दरम्यान सर्वांनी कोल्हापूर प्रमाणेच महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता मुंबई, नागपूर येथे जाऊन आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला. अखेर सर्वांनी कोल्हापूरचा आनंदाने निरोप घेऊन बेळगावच्या दिशेने प्रयाण केले.