Wednesday, January 1, 2025

/

कर्नाटकातील मंत्र्यांच्या मुक्ताफळांचा महाराष्ट्र विधानसभेत निषेध

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यातील वातावरण तापले असून काल महाराष्ट्र विधानसभेत सीमाप्रश्नी तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देणारा ठराव मंजूर केल्यानंतर आज कर्नाटक विधानसभेत कर्नाटकाच्या मंत्र्यांनी मुक्ताफळे उधळली. मुंबईत मराठी माणूस राहत नाही त्यामुळे मुंबई केंद्रशासित करावी असे बेताल वक्तव्य करणाऱ्या उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांना आज महाराष्ट्रातील मंत्र्यांनी चांगलेच सुनावले.

कर्नाटकातील नेत्यांच्या या विधानाचे महाराष्ट्र विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. महाराष्ट्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे राज्य सरकारचं लक्ष या मुद्द्याकडे वळवून या प्रकरणी कर्नाटक सरकारला तंबी देण्यासाठी पत्र पाठविण्याची मागणी केली.

मुंबई ही कुणाच्याही बापाची नाही. मुंबईवरील दावा खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकाला सुनावले. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सवदी यांनी मुंबई ही कर्नाटकचीच आहे असं विधान करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात विविध प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्याचा आपल्याला अभिमान आहे.

पण कर्नाटकाकडून सीमाप्रश्नाला चुकीचं वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठी माणसाच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर निवेदन तयार करून सभागृहाच्या भावना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना कळवाव्यात. लेखी पत्र देऊन त्यांना ताकीद द्यावी. कर्नाटकाच्या कायदा मंत्री आणि अपक्ष आमदाराच्या विधानाचा निषेध नोंदवावा.Fadanwis ajit dada

अजित पवार यांच्या या मुद्द्याची देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला विषय महत्वाचा असून केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. याला अनुसरूनच काल विधानभवनात ठराव मांडण्यात आला. मात्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी, आमदारांनी केलेले दावे बैठकीशी विसंगत असून पूर्णपणे चुकीचे आहेत असे फडणवीस म्हणाले.

अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील गोष्टींचं पालन महाराष्ट्र सरकार करत आहे. पण कर्नाटक सरकार करत नाही, हे योग्य नाही. त्यामुळे शहा यांनी कर्नाटकाच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे अशी आपण केंद्रीय मंत्र्यांना विनंती करणार आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती कुणाच्या बापाची नाही. तिच्यावर कुणाचा दावा सांगणं खपवून घेणार नाही. या संदर्भात या सभागृहाच्या भावना केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पोहोचवू, असंही फडणवीस यांनी जाहीर केलं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.