पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्राच्या वाहनांना लक्ष करून त्यांची तोडफोड केल्याप्रकरणी कन्नड रक्षण वेदिकेच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि संशयितांना अद्याप अटक करण्यात आली नसून त्यांचा शोध जारी आहे.
महाराष्ट्राचे सीमा भाग समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने हे काल बुधवारी बेळगावला येणार होते. मात्र कर्नाटक सरकारने त्यांच्यावर निर्बंध घातल्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर बेंगळूरसह राज्यातील विविध भागातून करणाऱ्या रक्षण वेदिका तसेच विविध कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दाखल होऊन महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. वाहन चालकांना धक्काबुक्की करण्याबरोबरच वाहनांच्या काचा फोडल्या, वाहनांवर कन्नड मजकूर लिहिला हे गैरप्रकार करत कन्नडीगांनी राष्ट्रीय महामार्गावर दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.
त्यावेळी उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असली तरी त्यानंतर सारवासारव करण्यासाठी पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या 12 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी ते फरारी असल्याचे सांगत त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.