कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हिरेबागेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या वाहनांना लक्ष करत दगडफेक केली त्यामुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्राच्या सीमा समन्वयक मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तापलेले वातावरण बेळगाव सह सीमा भागात तणावाची परिस्थिती निर्माण करून गेले आहे. एकीकडे कर्नाटकाच्या सूचनेवरून सीमा समन्वयक मंत्र्यांनी आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिका बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त, टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावची भट्टी चांगलीच तापलेली आहे.
दोन डिसेंबर रोजी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र काही कारणांनी तो दौरा सहा डिसेंबरला पुढे ढकलण्यात आला. याच पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांनी बेळगावात आंदोलन करून या सीमा समन्वयक मंत्र्यांचा निषेध करणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सहा डिसेंबरचा दौरा रद्द झाला असला तरीही कन्नड रक्षण वेदीकेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बेळगाव परिसरात दाखल झाले.
हिरेबागेवाडी टोलनाक्यावर त्यांची अडवणूक करण्यात आली असता पुणे बंगळूर महामार्गावर महाराष्ट्राच्या वाहनांना काळे फासणे आणि दगडफेक करणे आदी प्रकार त्यांनी सुरू केले होते त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं होते.
कन्नड रक्षण वेदीकेने बेळगावच्या इफ्फा हॉटेल पासून कित्तुर चन्नम्मा चौकापर्यंत निषेध आंदोलन करण्याचा चंग बांधला होता. मात्र पोलिसांना त्यांना रोखावे लागले. दुसरीकडे दौरा रद्द झाला असला तरी महाराष्ट्रातून नेते आणि कार्यकर्ते सीमा भागात प्रवेश करतील या भीतीने कोगनोळी टोलनाक्यावरही पोलिसांनी प्रचंड पोलीस फाटा ठेवून बंदोबस्त वाढविला. महाराष्ट्र कडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याच्या बरोबरीनेच नेते आणि कार्यकर्ते येत आहेत का? याची कसून चौकशी करण्यात कर्नाटकाच्या पोलिसांनी आघाडी उघडली होती. एकंदरच बेळगावच्या परिसरात सीमा प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापल्याचे सध्या निदर्शनास येत आहे. एकीकडे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जत वर आपला हक्क सांगून गोंधळात वाढ केलेली असताना सीमा वासियांसाठी विकासाचे पॅकेज घेऊन येणाऱ्या सीमा समन्वयक मंत्र्यांना पाठीमागे राहावे लागले. त्यामुळे सीमा वासिया जनता नाराज झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिकेने जोरदार थयथयाट सुरू केला असून त्यामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.