बेळगाव : सीमाप्रश्नी सीमावासीय जनता आक्रमक झाली असून कर्नाटक सरकारच्या अत्याचाराविरोधात आज ‘चलो कोल्हापूर’ ची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांच्या नेतृत्वाखाली सीमावासीय जनतेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बेळगावमधून रवाना झालेल्या बेळगावकरांच्या मोर्चात सर्वपक्षीयांनी सहभाग घेत कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला. ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, कोण म्हणतंय देत नाही?, घेतल्याशिवाय राहात नाही’ अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. हजारोंच्या संख्येने निघालेला मोर्चाचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या सीमावासीयांना महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनात बोलताना खासदार धनंजय महाडिक बोलताना म्हणाले, यापूर्वी सौंदत्ती येथे महाराष्ट्रातील वाहने अडविण्यात आली त्यावेळी कर्नाटकाला इशारा देण्यात आला होता. कर्नाटकात जाणारे रस्ते हे कोल्हापूरातूनच जातात याची जाणीव करून देण्यात आली होती. हनुमानाने छाती फाडून जशी रामभक्ती दाखवली तशी आमची छाती खोलली तरी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हीच कोल्हापूर भाजपाची भावना दिसेल, असे ते म्हणाले.
लोकसभेत संजय मंडलिक आणि राज्यसभेत खासदार धनंजय महाडिक हे सीमाप्रश्नी नक्कीच आवाज उठवतील अशी ग्वाही त्यांनी दिली. खासदार धनंजय महाडिक यांच्यासह शिवसेनेचे विजय देवणे, संजय पवार, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि इतर नेत्यांनी सीमावासीयांना पाठिंबा दर्शवत कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यावी, असे आवाहन केले.
या
आंदोलनात सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते आणि बहुसंख्य सीमावासीयांनी सहभाग घेत कर्नाटक सरकार आणि केंद्र शासनाच्या धोरणाचा पुन्हा एकदा निषेध नोंदविला.