बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून दोन्ही राज्यातील नेतेमंडळी एकमेकांवर वार-पलटवार करण्यात व्यस्त आहेत. सर्वोच्च न्यायालयातील अंतिम टप्प्यात असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये सुरु झालेली हमरी – तुमरी एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर सांगितलेल्या हक्कामुळे महाराष्ट्रातील नेतेमंडळी तापली असून त्यांनी बोम्मई यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला. याविरोधात आज बेळगावमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचा निषेध करणारा ठराव मांडला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकाला चेतावणी देत आपल्याला प्रवेश करू नाही दिला तर आपण चीनप्रमाणे कर्नाटकात प्रवेश करू असे विधान केले होते. या विधानावरून पुन्हा गदारोळ सुरु झाला असून संजय राऊत यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रत्त्युत्तर देताना संजय राऊत हे देशद्रोही आणि चीनचे एजंट असल्याचा आरोप केला.
संजय राऊत आणि महाराष्ट्रातील नेते ज्याप्रमाणे वक्तव्य करत आहेत यामुळे देशाची एकटा भंग होत असून जर महाराष्ट्रातील नेते अशापद्धतीने प्रक्षोभक विधान करून कायदा-सुव्यवस्था आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांची अडवणूक कशी करायची आणि कशापद्धतीने कायदेशीर कारवाई करायची हे आपल्याला चांगलेच ठाऊक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या अधिवेशनात ‘कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना मस्ती आल्याचे’ विधान करण्यात आले. महाराष्ट्रातील नेतेमंडळी टीका-टिप्पणी करण्याचा दर्जा विसरले असून एका राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी बोलताना त्यांना भाषेचे भान राहिले नसून यावरूनच महाराष्ट्रातील नेत्यांची वैचारिक क्षमता लक्षात येत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. शिवाय महाराष्ट्रातील प्रशासनाला तेथील जनता वैतागली असून तेथील राजकारण्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
ज्याप्रमाणे येथील कार्यक्रमांना महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रण मिळते त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील मंत्र्यांनाही सोलापूर, अक्कलकोट येथून आमंत्रणे येतात. मात्र येथील नेतेमंडळींना वेळ नसल्याने ते त्याठिकाणी पोहोचू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी जयंत पाटील यांच्यावरदेखील मुख्यमंत्र्यांनी तोफ डागत कृष्णेचे पाणी देणे किंवा न देणे हे महाराष्ट्राच्या हातात नसून ती देशाची आणि नैसर्गिक संपतती असून पाणी आणि वारा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे सांगितले. पुराणकाळापासून पाणी आणि वारा रोखणे कुणालाही शक्य झाले नसून देशातील नैसर्गिक संपत्ती हि राज्यापुरती मर्यादित नसल्याचे सांगितले. एकेकाळी जयंत पाटील यांच्याशी आपण जलविवादावर चर्चा केली. परंतु आता त्यांची भाषा बदलल्याचे सांगत कर्नाटकात सर्वाधिक लांब कृष्णा नदी वाहत असून कृष्णेचे पाणी रोखणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील नेत्यांना आपल्या भाषेत, आपल्या शैलीत आपल्याला उत्तर देता येणे सोपे आहे. परंतु हि आपली संस्कृती नाही. कर्नाटकातील लोक संस्कृती जपणारे आणि कायद्याचे पालन करणारे आहेत, मात्र मर्यादेपलीकडे आपण सहन करणार नाही आणि शांतही बसणार नाही, आपल्याला संविधान, हक्क आणि कायदा याबाबत संपूर्ण माहिती असून महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य उत्तर देऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.