बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री, आमदार रमेश जारकीहोळी आणि के. एस. ईश्वरप्पा यांच्यावरील आरोपामुळे त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र उभयतांना मंत्रिपद देण्यात येणार कि नाही? याबाबत बरीच चर्चा होत असून यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
रमेश जारकीहोळी आणि के. एस. ईश्वरप्पा यांना मंत्रिपद देण्याबाबत होत असलेल्या चर्चेबाबत दिल्ली दरबारी प्रस्ताव मांडण्यात आला असून दिल्ली येथील पक्षश्रेष्टींच्या बैठकीदरम्यान याबाबाबत चर्चा सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी केवळ सहा महिन्यांचा अवधी शिल्लक असूनही अद्याप कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपदाबाबत बरीच चर्चा सुरु आहे. अश्लील सीडी प्रकरणी रमेश जारकीहोळी आणि कमिशनवरून कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी अडकलेले के. एस. ईश्वरप्पा यांच्या मंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यांना मंत्रिपद मिळणार कि नाही? याबाबत विविध चर्चांना ऊत आला असून याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मईनि आज स्पष्टीकरण दिले आहे. बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही आमदार गैरहजर राहिल्यानंतर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत खुलासा मागितला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, रमेश जारकीहोळी आणि ईश्वरप्पा यांच्या मंत्रिपदाबाबत दिल्लीत चर्चा होणार असल्याचे सांगत यासंदर्भात आपण दिल्ली येथील बैठकीत प्रस्ताव ठेवल्याचे ते म्हणाले. आपण दोघांच्या सतत संपर्कात असून त्यांच्यावरील आरोप हटल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
डी.के. शिवकुमार यांच्यावर झालेल्या सीबीआय कारवाईबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीबीआय ही कायदेशीर संस्था आहे. सीबीआयने कोणत्या कारणास्तव कारवाई केली आहे, याबाबत डीकेशींना चांगलीच माहिती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
याचप्रमाणे हलाल संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांनी आता हा मुद्दा सोडून देण्याची सूचना केली. पंचमसाली समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने मागास आयोगाला योग्य अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहवाल आल्यानंतर आरक्षणाबाबत कायदेशीर निर्णय घेऊन कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.