बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाचा भोंगळ कारभार अद्याप सावरलेला नाही. साधारण २०१६ साली सुरु झालेले कामकाज २०२२ साल संपत आले तरीही अर्धवट स्थितीतच आहे.
यामुळे बेळगावच्या विकासापेक्षा बेळगाव भकास करण्यात अधिक भर देण्यात आल्याचे जाणवत आहे. बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या बहुतांशी कामकाजावर नागरिक रोष व्यक्त करत असून स्मार्ट सिटी कामकाजातील त्रुटींचा नागरिकांना आजवर अनेकवेळा फटका सहन करावा लागला आहे.
देशमुख रोड, टिळकवाडी येथेही स्मार्ट सिटी कामकाजांतर्गत हाती घेण्यात आलेल्या पथदिपाचे कामकाज अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. फुटपाथवरील डेकोरेटिव्ह लाईटससाठी देण्यात आलेले कनेक्शन खुलेच सोडून देण्यात आल्याने हि बाब धोकादायक ठरत आहे. फुटपाथवरील अर्धवट स्थितीत आणि खुल्या बारमुळे हि बाब नागरिकांसह जनावरांच्याही जीवावर सहज बेतू शकणारी आहे.
स्मार्ट सिटी कामकाज अंतर्गत बेळगावमध्ये उभारण्यात आलेले स्मार्ट पथदीप, भूमिगत वीजवाहिन्या यांचे कामकाज संथगतीने सुरु असून ज्या ज्या ठिकाणी कामकाज हाती घेण्यात आले आहे, त्याठिकाणची काम अर्धवट असल्याचे दिसून आले आहे. अर्धवट स्थितीतील कामामुळे अनेकवेळा नागरिकांच्या जीवावरही बेतले आहे.
स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अर्धवट स्थितीतील कामकाजाचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. तसेच यामाध्यमातून जनतेचे कोट्यवधी रुपये वायफळ खर्च केले जात असल्याचा आरोपही होत आहे. स्मार्ट सिटी मध्ये गणल्या जाणाऱ्या बेळगावमधील स्मार्ट सिटीची कामे कधी पूर्ण होतील? आणि नागरिक कधी सुटकेचा निश्वास सोडतील, असे प्रश्न सोशल साईटच्या माध्यमातून सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.