न्यायालयाचा आदेश असताना देखील पत्नीला पोटगी देत नसल्याबद्दल बेळगाव कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पतीला कारावासाची शिक्षा ठोठावल्याची घटना काल शुक्रवारी घडली.
अमर विष्णू अंबरोळे (वय 35, रा. बसवान गल्ली, खासबाग बेळगाव) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या पतीचे नांव असून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. घटस्फोटानंतर अमर याची पत्नी मनाली अंबरोळे हिने पोटगीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्या याचिकेवर गेल्या 22 फेब्रुवारी 2022 रोजी सुनावणी होऊन बेळगाव कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. व्ही. श्रीनाथ यांनी अमर अंबरोळे याने आपली पत्नी व मुलाच्या देखभालीसाठी त्यांना एकूण दरमहा 8 हजार रुपये पोटगी द्यावी असा आदेश दिला होता. त्यात एकूण रकमेपैकी दरमहा 6 हजार रुपये पत्नीला आणि 2 हजार रुपये मुलाला मिळाले पाहिजेत असे नमूद करण्यात आले होते.
न्यायालयाच्या आदेशानंतरही आपला पती आपल्याला पोटगीच देत नसल्याची तक्रार मनाली हिने केली होती. त्यावर काल शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाचा आदेश धुडकावल्याबद्दल अमर विष्णू अंबरोळे याला कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मनाली अमर अंबरोळे आणि तिचा मुलगा कु. मिथिलेश अमर अंबरोळे यांच्यावतीने ॲड. मनीष जे. जाधव यांनी काम पाहिले.