Saturday, December 21, 2024

/

त्या’ जमिनीच्या बदल्यात लष्कराला खानापूरात जमीन देण्यास तयार -निराणी

 belgaum

आयटी पार्कसाठी भूसंपादित केल्या जाणाऱ्या बेळगाव नजीकच्या जमिनीच्या बदल्यात कर्नाटक सरकार लष्कराला खानापूर येथील जमीन देण्यास तयार आहे आणि तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालय समोर मांडण्यात आला आहे, अशी माहिती बृहत आणि मध्यम औद्योगिक खात्याचे मंत्री मुर्गेश निराणी यांनी दिली.

बेळगावातील हिवाळी अधिवेशनादरम्यान बेळगावच्या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना औद्योगिक मंत्री निराणी म्हणाले की, भव्य आयटी पार्क उभारण्यासाठी बेळगावनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 लगत असलेली 750 एकर जमीन कर्नाटक राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात यावी यासाठी यापूर्वी अनेकदा नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन विनंती करण्यात आली आहे.

बेळगावनजीक पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हे क्र. 1304 ते 1349 पर्यंतची जमीन लष्कराच्या ताब्यात आहे. तुर्कमट्टी येथील मिलिटरी फार्मलँड तुर्कमट्टी म्हणून ओळखली जाणारी संबंधित एकूण 31 सर्व्हे क्रमांकांमधील 754 एकर 33 गुंठे (754.82 एकर) जमीन बेळगाव हे बॉम्बे (मुंबई) संस्थानात असताना 1873 आणि त्यानंतर 1875 मध्ये बॉम्बे सरकारच्या ठरावानुसार लष्करी खात्याकडे हस्तांतरित करण्यात आली. तेंव्हापासून म्हणजे गेल्या 140 वर्षापासून लष्कराचा या जमिनीवर ताबा आहे.Nirani

बेंगलोर येथील डिफेन्स इस्टेट ऑफिसरच्या मिलिटरी लँड रजिस्टरमध्ये या जमिनीची तपशीलवार नोंद आहे. उपलब्ध माहितीनुसार या एकूण जमिनीपैकी 13.625 एकर आणि 20 एकर जमीन एमओडी कडून 1978 आणि 1984 साली अनुक्रमे राज्य सरकार व आयसीएमआर यांच्याकडे हस्तांतरण मूल्य अदा झाल्यानंतर हस्तांतरित करण्यात आली आहे. आता उर्वरित शिल्लक असलेली 721.195 एकर जमीन लष्करी कुरणाची शेती म्हणून ओळखली जाते. जिचे व्यवस्थापन क्यूएमजीकडे आहे, अशी माहिती मंत्री निराणी यांनी दिली.

बेळगाव नजीक आयटी पार्कसाठी निश्चित केलेल्या 750 एकर जमिनीच्या बदल्यात कर्नाटक सरकार संरक्षण खात्याला खानापूर तालुक्यात जमीन उपलब्ध करून देण्यास तयार आहे आणि तसे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना कळविण्यातही आले आहे. त्यासाठी खानापूर येथे सरकारच्या मालकीची 1000 एकर जमीन सुचित करण्यात आली आहे असे सांगून लष्करी उपक्रम खानापूर येथे राबविण्यात कोणती समस्या येणार नसल्याची हमीही त्यांनी दिली.

तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी आमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली तर अंतरिक्ष, संरक्षण, सेमीकंडक्टर पार्क, डाटा सेंटर वगैरे क्षेत्राशी संबंधित उद्योग बेळगावात आणण्यासाठीची द्वारे खुली होणार असून ज्यामुळे बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे बृहत आणि मध्यम औद्योगिक खात्याचे मंत्री मुर्गेश निराणी यांनी शेवटी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.