बेळगाव : सुवर्णविधानसौध येथे आजपासून भरणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सर्व आंदोलने शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस खात्याने खबरदारी घेतली आहे. अधिवेशनकाळात पाच हजार पोलीस फौजफाटा तैनात असेल, शिवाय खबरदारीसाठी तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ६ ड्रोन कामेऱ्यांचीही नजर बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून असेल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली आहे.
सोमवारपासून बेळगावमधील सुवर्णविधानसौध येथे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होणार असून याचदिवशी व्हॅक्सिन डेपोवर मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र परवानगी नाकारल्याचे सांगत, तसेच अधिवेशनकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महामेळाव्याला बंदी घालण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी संपूर्ण अधिवेशन काळात पोलीस विभागाने खबरदारी घेतली आहे. स्थानिक पोलिसांसह बाहेरील जिल्ह्यातील पोलीस कुमकदेखील मागविण्यात आली आहे. संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सहा ड्रोन कॅमेरे देखील सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी बेळगाववार करडी नजर ठेवणार आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव मात्र आजदेखील मराठी भाषिकांवर दडपशाहीचे अस्त्र उगारण्यात आले असून व्हॅक्सिन डेपो परिसरात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड करून व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरात १४४ कलम देखील लागू करण्यात आला असून माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह समिती नेते, महिला नेत्या, कार्यकर्ते-कार्यकर्त्यांनादेखील पोलिसांनी अटक केली असून टिळकवाडी पोलीस स्थानकातून सदर मेळाव्याला परवानगी नाकारल्याचे कारण देण्यात आले आहे. व्हॅक्सिन डेपो परिसरात एडीजीपी अलोक कुमार आणि डीसीपी रवींद्र गडादि यांनी भेट दिली.