बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणानंतर आपण कोणतेही विधान केले नसून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फेक ट्विट पोस्ट केल्याचे विधान करत बोम्मईंनी घुमजाव केले.
मात्र ते विधान मुख्यमंत्र्यांच्या वेरिफाइड अकाउंट वरूनच झाले असून महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार बोम्मई यांचा बचाव करत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केलाय.
ट्विटर अकाउंटवर ‘ब्ल्यू टिक’ असणे म्हणजेच ते अकाउंट सत्यापित आणि खरे असते. मात्र कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रक्षिभक ट्विटमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असून त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाईल? असा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला आणि त्यांच्या विधानाला पाठिंबा देणे योग्य नसून महाराष्ट्र सरकार कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा बचाव करत असल्याचा आरोपही केला.
“ट्विट्सला बनावट म्हणण्याचा आधार काय?” असा सवाल करत कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर प्रक्षोभक विधाने करूनही शिंदे सरकार शांत कसे? असा सवालही त्यांनी विचारला.
यावर प्रत्त्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर स्पष्टीकरण दिले असून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रीतसर पत्र लिहिण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.