सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि सिंगल यूज प्लास्टिक वरील बंदीसाठी देशभरात सायकल वरून जनजागृती करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मध्यप्रदेश येथील सायकलिंगपटू ब्रिजेश शर्मा यांचे नुकतेच बेळगावत आगमन झाले असून वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगाव तसेच अन्य संस्थातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच संपूर्ण देश व जग सिंगल युज प्लास्टिक मुक्त व्हावे यासाठी मोरियाना मध्यप्रदेश येथील 32 वर्षीय ब्रिजेश शर्मा यांनी सायकल वरून देशभरात जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
सदर मोहिमेसाठी गेल्या 2019 साली ते घराबाहेर पडले असून आतापर्यंत त्यांनी सुमारे 36 हजार कि. मी. अंतराचा सायकल प्रवास केला आहे. देशातील आठ राज्यांना भेटी देणाऱ्या सायकलिंगपटू ब्रिजेश शर्मा यांनी तेथील एकूण सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांसह एकूण जवळपास 32 लाख नागरिकांना सेंद्रिय शेतीचे महत्व आणि सिंगल युज प्लास्टिकचा धोका व त्यावरील बंदीची गरज याबाबत जागरूक केले आहे.
बेळगाव शहरात दोन दिवसांपूर्वी ब्रिजेश शर्मा यांचे आगमन झाले आहे. बेळगावच्या वेणुग्राम सायकलिंग क्लबसह इतर संस्थांनी शर्मा यांचे शहरात सहर्ष स्वागत केले. शहरात दाखल झालेल्या ब्रिजेश शर्मा यांनी येथील जैन स्कूलसह विविध शैक्षणिक व बिगर शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन आपल्या मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला तसेच उपस्थितांना त्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.
वेणूग्राम सायकलपटूंच्या निमंत्रणावरून आज शनिवारी सकाळी शर्मा यांनी त्यांच्यासमवेत सुमारे 20 कि. मी. सायकलिंग केले. त्याचप्रमाणे बेळगावच्या उपस्थितीत सायकलपटूंची संवाद साधून आपल्या मोहिमेची माहिती दिली आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वेणूग्राम सायकलिंग क्लबचे सदस्य रोहन हरगुडे, राजू नायक, पवनकुमार गौडर, डॉ. रूपा कापाडिया, डाॅ. सुजाता गावकर आदींसह संजय काकतकर व सीपीआय निरंजन पाटील उपस्थित होते.
ब्रिजेश शर्मा हे बेळगावहून पुढे विजापूर, गुलबर्गा, बागलकोट, रायचूर, मंड्या मार्गे केरळला जाणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये त्यांना मदत व्हावी यासाठी आज सकाळी चहापानानंतर वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी विजापूर, गुलबर्गा, बागलकोट येथील आपल्या सायकलिंगपटू मित्रांशी त्यांचा संपर्क साधून दिला.